Site icon Manvadhikar Abhivyakti News

व्यापाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या एका कथित पत्रकाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या । —- रिपोर्ट – प्रमोद कुमार

ठाणे – कल्याण व ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरातील व्यापाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या एका कथित पत्रकाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. संजय देशमुख असे या खंडणीबहाद्दराचे नाव असून त्याने जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना सळो की पळो करुन सोडल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्या पथकाने ही कारवाई केली.खंडणीकोर पत्रकार संजय देशमुख व्यापाऱ्यांच्या विरोधात विविध ठिकाणी अर्ज करणे, ब्लॅकमेल करुन तडजोड करणे व त्यानंतर सावज जाळ्यात येताच त्याच्याकडून खंडणी वसूल करणे, यात हा कथित पत्रकार तरबेज आहे. साप्ताहिक गुन्हे वार्ता आणि साप्ताहिक आपला भगवा अशा दोन साप्ताहिकांची ओळखपत्रे जवळ बाळगून त्याद्वारे ब्लॅकमेल करणाऱ्या या सराईत खंडणीबहाद्दराच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यातून अशाच आशयाचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. त्याच्या उपद्व्यापाला बळी पडलेल्या कल्याणच्या एका व्यापाऱ्याने ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे, विकास घोडके, फौजदार विलास कुटे, हेमंत ढोले, रोशन देवरे आदींच्या पथकाने कल्याण-मुरबाड रोडच्या एका हॉटेलजवळ शनिवारी संध्याकाळी सापळा लावला. यावेळी व्यापाऱ्याकडून तडजोडीचे २० हजार रुपये घेताना खंडणीबहाद्दर कथित पत्रकार संजय देशमुख याच्या खंडणी विरोधी पथकाने मुसक्या बांधल्या. आरोपी देशमुख याच्या विरोधात महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात भादंवि कलम ८३४, ३८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. कल्याण न्यायालयाने अधिक चौकशीसाठी त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यानंतर या पथकाने आरोपी देशमुख याचा ताबा घेतला असून त्याची सखोल चौकशी करण्यात येत आहे.

Exit mobile version